काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याची वेळ येत आहे. यास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा आडमुठेपणा व विश्वासघातकी डावपेच असल्याचे स्पष्ट मत माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी व्यक्त केले. दुर्दैवाने हर्षवर्धन पाटील यांना राज्यस्तरीय नेतृत्व न्याय देऊ शकले नाही. अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या काळात नगरची जागा सुजय विखे पाटील यांना सोडली असती, तर राज्याच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसचे चित्र वेगळे दिसले असते. त्याही वेळेस राष्ट्रवादीने आडमुठे धोरण स्वीकारले. त्याचेच परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोगावे लागले. आज पक्षातील गळती थांबवण्यासाठी सक्षम नेतृत्व नाही याची खंत वाटते.
दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असते, तर विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर अन्याय होऊ दिला नसता. आज त्यांच्यावर पक्ष सोडून देण्याची वेळ आली नसती. काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था झाली आहे ही वेळ विलासराव देशमुख यांनी काँग्रेसवर येऊ दिली नसती असे छाजेड यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या या अवस्थेमुळे राज्यातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही वेळ एकजुटीने आव्हान पेलण्याची असताना दोन्ही पक्षात सुसूत्रता येत नाही. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने वेळोवेळी सोयीचे आणि गांधी घराण्याच्या द्वेषाचे राजकारण केल्याने नुकसान होत आहे. यासाठीच माजी पंतप्रधान यांच्या नेतृत्वात मोठे झालेल्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन आव्हानाला समोर जाण्याची वेळ आली आहे. असे छाजेड यांनी सांगितले आहे.